श्री शंकर आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।
लावण्य सुंदर मस्तकी बाळा ।
तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ॥ जय देव
जय देव जय देव जय श्री शंकरा ।
आरती ओवाळू तुज कर्पूरगौरा ॥ जय देव
कर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा ।
अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।
विभुतीचे उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव
देवी दैत्य सागर मंथन पै केले ।
त्यामाजी अवचित हलाहल जे उठले ।
ते त्वां असुरपणे प्राशन केले ।
नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ॥ जय देव
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी ।
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरी ॥ जय देव
- समर्थ रामदासस्वामी